विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा गावठी दारु विक्री, मटका, जुगार, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच प्रकारचे अवैध धंदे नव्या जोमाने सुरु होऊ लागले आहेत. भेकराईनगर, फुरसुंगी, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह हडपसर व लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत सर्वच प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू होऊनही, पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट असे धोरण अवंलबले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आठवडाभऱापुर्वी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश पोलिस अधिकाऱ्यांच्या गुन्हे विषय़क मिटिंगमध्ये (Crime Meeting) दिले होते. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येतील, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला होता.
मात्र अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतरही हडपसर व लोणी काळभोर हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध सुरु होऊ लागल्याने, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाला लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व त्यांच्या हाताखालील पोलिसांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे दिसुन येत आहे.
पुणे शहर पोलिसांचा विशेष सामाजिक शाखा शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकुन, जुगार, मटका, गांजा विक्री सारख्या अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना, वरील दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र मागिल काही दिवसापासुन अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु झाला आहे.
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू राजरोसपणे सुरु आहेत. दारुबंदीच्या निर्णयानंतरही शहरात काही ठिकाणी राजरोसपणे दारु विक्री तसेच खुलेआम मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरुच असल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक चर्चा सुरु झाली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आठवडाभऱापुर्वी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले असले तरी, अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील मटका, जुगार, दारू खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करतांना पाहत असतात. मात्र कारवाई का करत नाही? हा प्रश्न कायमच सतावत आहे.
गुटखा बंदी नावालाच…
राज्यात गुटखा बंदी असतानाही, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ९९ टक्के पानटपऱ्यात मात्र हवा तेवढा गुटखा खुल्या पध्दतीने विकला जात आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर, माळीमळा, लोणी स्टेशन हद्दीतील काही पानटपऱ्यात तर गुटख्याची विक्री होलसेल पध्दतीने केली जात आहे. याबाबतची माहिती पोलिसांना असुनही, लोणी काळभोर पोलिस मात्र त्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच अवैध धंदे सुरु होत असताना, पोलिसांना मात्र ते दिसत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.