पुणे : कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) गैरवापर केल्याप्रकरणी आयटी कंपनी व तिच्या संचालकांविरोधात कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पुणे कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे. ‘क्लोव्हर इन्फोटेक’ असे या खासगी आयटी कंपनीचे नाव आहे.
या कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला जात नसल्याची तक्रार ‘ईपीएफओ’च्या पुणे कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्याची तातडीने दखल घेत सहायक पीएफ आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमण्यात आले.
या पथकाने कंपनीच्या बोट क्लब रस्त्यावरील कार्यालयाची झडती घेतली. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुमारे ३.८२ कोटी पीएफ थकबाकीचा गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास करण्यात आला. त्यात या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या तीन कोटी ८२ लाख ४९ हजार ५५६ रुपयांच्या पीएफ थकबाकीचा गैरवापर केल्याचे उघड झाले.
दरम्यान, पीएफच्या लाभापासून वंचित राहणारे कर्मचारी कंपनी किंवा कंत्राटदाराविरोधात ‘ईपीएफओ’च्या कार्यालयाकडे तक्रार करू शकतात. पुराव्यासह दाखल केलेल्या तक्रारींवर योग्य कारवाई केली जाईल, असे आवाहन ‘ईपीएफओ’ कार्यालयाने केले आहे. कंपनी व तिच्या संचालकांविरोधात पीएफ कायद्याच्या ‘कलम ७ ए’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.