Santosh Deshmukh पुणे, ता. ७ : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता नव्या टप्प्यावर पोहोचले असून, या प्रकरणातील आरोपींनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आरोपी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांनी बीड विशेष मकोका न्यायालय यांनी निश्चित केलेले दोषारोप रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणाकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. Santosh Deshmukh

सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू असून, आरोपींच्या वकिलांकडून विविध महत्त्वाच्या मागण्या करण्यात येत आहेत. घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण न्यायालयात दाखवण्यात यावे, अशी मागणी बचाव पक्षाने केली आहे. तसेच तपासात जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपची ‘क्लोन कॉपी’ देण्यात यावी, अशी मागणीही पुन्हा करण्यात आली आहे.
सरकारी पक्ष केवळ स्वतःला अनुकूल असलेला डेटा सादर करत असल्याचा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला असून, न्यायालयाने स्वतः लॅपटॉप कोर्टात उघडून संपूर्ण डेटा तपासावा, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी जयराम चाटे याने बीड न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, प्रतीक घुले याने जेलमधूनच अर्ज सादर केला आहे. तर विष्णू चाटे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. Santosh Deshmukh
९ डिसेंबर २०२४ रोजी केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तपासानुसार, सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले. त्याठिकाणी अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या मारहाणीचे काही फोटो आरोपींनी मोबाईलमध्ये काढल्याचे समोर आले होते. हे फोटो सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी १२ मार्च रोजी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयात तब्बल १८०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात गुन्ह्याचा घटनाक्रम, आरोपींची भूमिका आणि पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. या गाजलेल्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ मे रोजी होणार असून, उच्च न्यायालयातील सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. Santosh Deshmukh







