Ambegav News आंबेगाव : पारगाव (त. आंबेगाव) परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहित तरुणीचे तिच्याच वडिलांनी साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याचा प्रकार समोर आला असून, जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याचा कट पोलिसांनी ४ मे २०२६ रोजी हाणून पाडला आहे. या प्रकरणात पारगाव कारखाना पोलीस ठाणे यांनी अवघ्या चार तासांत सात आरोपींना अटक करत तत्परतेचे दर्शन घडवले. Ambegav News
शिवाजी भाऊ खाटेकर (रा. पारगाव, ता. आंबेगाव), अमोल चांगदेव रोडे, सचिन रावसाहेब रोडे, अक्षय विश्वनाथ वाडगे, अभिजीत बारकू रोडे, नंदकिशोर विलास तितर (सर्व रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर) तसेच जयश्री अशोक कुदनर (रा. साकोर, ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे. Ambegav News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी विशाल भागवत या आपल्या सासरच्या व्यक्तीसोबत पारगाव येथील लबडे मळा परिसरात असताना आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करत जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले. प्राथमिक तपासात, पीडितेचे जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि वेगवान हालचालींमुळे अवघ्या चार तासांत सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. या प्रकरणात सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे एका विवाहितेचे संभाव्य अनर्थापासून रक्षण झाले असून, पारगाव कारखाना पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. Ambegav News






