Big Breaking बीड, ता. ७ : जायकवाडी भूसंपादन घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली आहे. बनावट सह्या, जुन्या तारखांचे आदेश आणि कोट्यवधी रुपयांच्या वाढीव मोबदल्याच्या व्यवहारांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याला अटक झाल्याने राज्यभरात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. Big Breaking
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भूसंपादनाच्या प्रक्रियेत बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून सुमारे ७२ कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते. तसेच एकूण २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या वाढीव मोबदल्याचा घोटाळा उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. हा संपूर्ण प्रकार तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला होता.

या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांमधील व्हॉट्सअॅप संभाषणे, बनावट स्वाक्षऱ्यांचे नमुने आणि विविध कागदपत्रांच्या आधारे तपास करण्यात आला. तपासादरम्यान अविनाश पाठक यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना लातूर येथून ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी या कारवाईस दुजोरा दिला. Big Breaking
यापूर्वी या प्रकरणात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी एम. व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासानुसार, बीडमधील वरिष्ठ भूसंपादन कार्यालयातील तब्बल १५४ प्रकरणांमध्ये वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आले होते. या आदेशांद्वारे सुमारे २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती.
चौकशीदरम्यान अविनाश पाठक यांच्या स्वाक्षरीचे नमुने हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तसेच त्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रकरणात १ मार्च २०२५ ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत त्यांच्या नावाने आणि बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे १५४ आदेश निर्गमित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. Big Breaking
दरम्यान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जायकवाडी भूसंपादन कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान जुन्या तारखांचे आदेश मंजूर होत असल्याचा प्रकार लक्षात आणून दिला होता. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांमधील संभाषण समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तपासात परळी तहसील कार्यालयातील काही अधिकारी, कंत्राटी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचाही सहभाग समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिक खोलात गेला आणि त्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचाही सहभाग असल्याचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशीसाठी त्यांना बीडमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.







