पुणे : भादोले (ता. हातकणंगले) येथे लग्नाच्या वरातीसमोर तोकड्या कपड्यांत दोन तरुणींनी अश्लील हावभाव करीत बिभत्स नृत्य केले. याप्रकरणी दोन नृत्यांगनांसह 8 जणांवर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
युगश्री देविदास शेरकर (वय 20) व अंजली थापा (20, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) या नृत्यांगनांनी वरातीसमोर तोकड्या कपड्यांत डॉल्बी साऊंड सिस्टिमवर अश्लील नृत्य केले.
लोकांना त्रास होत असल्याची निनावी तक्रार वडगाव पोलिसांना मिळाली. त्यामुळे वडगावचे पोलिस निरीक्षक भैरवनाथ तळेकर यांनी ही वरात थांबविली. तसेच आयोजक सुरेश पाटील, नानासो पाटील, प्रमोद पाटील, तुषार पाटील, सौरभ पाटील, माणिक पाटील, प्रवीण पाटील (सर्व रा. भादोले) आणि संतोष पाटील (रा. तळसंदे) तसेच नृत्यांगना युगश्री शेरकर, अंजली थापा यांच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणे, वाहतुकीस अडथळा करणे, सामाजिक स्वास्थ बिघडविणे या कलमांखाली त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय ट्रॅक्टर-ट्रॉली, डॉल्बी साऊंड सिस्टिम जप्त केले.