Nagpur News : नागपूर : दहावीत शिकणाऱ्या मुलाने क्लासला दांड्या मारल्या म्हणून वडिलांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. सांगूनही ऐकत नाही म्हणून अखेर बोलणे बंद केले. वडिलांचा अबोला मुलाच्या जिव्हारी लागला. अस्वस्थ झालेल्या मुलाने घराचा वरच्या माळ्यावर जाऊन, सळईला टॉवेल बांधून गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. रविवारी (ता. ९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नागपूरमध्ये शांतीनगर येथील लालगंजच्या झाडे चौकात ही खळबळजनक घटना घडली.
नागपूर येथील घटना
वेद रितेश केळवदकर (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. वेद दहावीत शिकत होता. दहावीत उत्तम गुण मिळवून पास व्हावा, या अपेक्षेने वडिलांनी त्याला क्लास लावले होते. मात्र, तो अनेकदा क्लासला दांड्या मारत होता. क्लासमधून ही बाब वेदच्या वडिलांच्या कानावर आली. पैसे भरूनही मुलगा क्लासला दांड्या मारत असल्याने वडिलांनी त्याला वेळोवेळी समजावून सांगितले. (Nagpur News) अभ्यासाचे महत्त्वही वडिलांनी वेदला पटवून दिले. तरिही वेद वडिलांचे बोलणे मनावर घेत नव्हता. अखेर वडिलांनी वेदशी अबोला धरला. वडिलांच्या अबोल्यामुळे वेदच्या मनाला टोचणी लागली. तो अस्वस्थ झाला. त्याच भरात वेदने चुकीचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, कुटुंबातील सदस्य घरी परतल्यावर घरी कोणीच दिसत नसल्याने नातेवाईकांनी वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता, वेदने सळईला टॉवेल बांधून गळफास घेतल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. (Nagpur News) नातेवाइकांनी वेदला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
वेदच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे केळवदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagpur News : पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा जलतरण तलावात बुडून मृत्यू