लोणी काळभोर : दारू पिताना बॅगेतून पैसे काढून घेतलेल्या वादातून मित्रानेच खून केल्याची धक्कादायक घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ए के वाइन्सचे शेजारील पत्र्याचे शेड जवळ असलेल्या मोकळ्या जागेत सोमवारी (ता७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अंकुश रामराव कोवे (वय ३०, रा. मु. पो. नागझरी ता. किन्वट, जि नांदेड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अख्तर रहीम सय्यद (वय माहिती नाही, पत्ता, कुंजीरवाडी ता.हवेली) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अख्तर यांची पत्नी जास्मीन अख्तर सय्यद (वय ३५, कुंजीरवाडी ता.हवेली, मुळ रा. मु. पो घारगाव ता. परांडा जि ऊस्मानाबाद) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर सय्यद आणि आरोपी अंकुश कोवे हे दोघे मित्र होते. दोघेजण सोमवारी (ता७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी येथील ए. के. वाइन्सचे शेजारील पत्र्याचे शेड जवळ असलेल्या मोकळ्या जागेत दारू पीत होते. तेव्हा आरोपी अंकुश कोवे याने अख्तर सय्यद यांच्या बॅगेतून पैसे काढून घेतले. तेव्हा सय्यद यांनी आरोपी कोवे यांना पैसे परत मागितले.
त्यानंतर आरोपी अंकुश कोवे आणि अख्तर सय्यद यांच्या पैसे मागण्यावरून वाद झाले. व आरोपीने सय्यद यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व पायावर दगड मारून खुन केला आहे. असे जास्मीन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी अंकुश कोवे याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहीता कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी अंकुश कोवे याला ताब्यात घेतले आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.