उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एका ३७ वर्षीय महिलेचा राहत्या घरात अज्ञात व्यक्तीने गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तसलीम जमीर शेख (वय ३७, माऊली कृपा बिल्डिंग, जय मल्हार रोड, पिराचा चौक, उरुळी कांचन, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
हा खून कोणी व कशासाठी केला हे गुलदस्त्यात असून हल्लेखोराचा शोध व खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तसलीम जमीर शेख या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार रोड परिसरात आपल्या पती व एका मुलासोबत राहत होत्या. राहत्या घरात तसलीम शेख यांचा मृतदेह पोलिसांना आढळला होता.
पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला असता शवविच्छेदन अहवालात तसलिम यांचा गळा दाबल्यामुळे आणि शरीरावरील बोथट जखमामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान, तसलिम यांचा खून झाला त्यावेळी घरात तिचा पती व १८ वर्षाचा मुलगा दोघेच उपस्थित होते. त्यामुळे या दोघांनीच या महिलेचा खून केला असावा असा दाट संशय लोणी काळभोर पोलिसांना आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.