लोणी काळभोर (पुणे) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती येथे मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अब्दुल हमीद शमशुद्दिन शेख (वय-३५, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सागर पाटोळे व सागर गुडेकर (पूर्ण नाव माहित नाही) रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, (ता. हवेली) असे खून करणाऱ्या दोघांची नावे असून पोलिसांना दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी उल्फत अब्दुल हमीद शेख (वय-३२, रा. सदर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्फत व अब्दुल हे मागील १५ वर्षापासून कुटुंबासहित कदमवाकवस्ती येथील घोरपडेवस्ती परिसरात राहतात. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उल्फत या घरकाम संपवून घरी आले होते. घरातील कामाची आवराआवर करीत असताना सात वाजण्याच्या सुमारास अब्दुलच्या मित्राने मोबाईलवर सांगितले कि, तुमच्या पतीला इंदिरानगर चौकात पाण्याच्या टाकीजवळ सागर पाटोळे व सागर गुडेकर हे मारहाण करीत आहेत. तिघांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून तुमच्या पतीला लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात मारून गंभीररित्या जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. व त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उल्फत यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अब्दुल हमीद शेख हे बेशुद्ध अवस्थेत दिसून आले व डोक्याला पट्टी बांधलेली दिसून आली. सदर ठिकाणच्या दवाखान्याचा खर्च परवडत नसल्याने ससून ठिकाणी पुढील उपचाराकरिता घेऊन गेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस हवालदार तेज भोसले, अजिंक्य जोजारे यांनी भेट दिली. पुढील तपासपोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.