पुणे : पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींची रोकड व २० मोबाईल फोन ईडीने जप्त केले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यातील पैसे असल्याचा ईडीला संशय आहे.
पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीने शोध मोहीम राबवत आहे. त्यानुसार धाडी टाकण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींची रोकड जप्त करण्यात आली. शिक्षक भरती घोटाळ्यातील पैसे असल्याचा ईडीला संशय आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला, तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी रोकडसह पोलिसांनी २० मोबाईल फोन जप्त केले आहेत. अर्पिता चटर्जी यांच्याव्यतिरिक्त EDने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवरही कारवाई केली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील SSC घोटाळ्यामध्ये सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. कोलकाता उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश दिले होते.