पुणे : कुख्यात गुंड विनोद जामदारे व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोक्का)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले असून त्यांची मोक्काची पुण्यातील १० वी कारवाई आहे.
टोळी प्रमुख विनोद शिवाजी जामदारे (वय-३२ रा. वडगाव, मुळ रा. लोणारवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद-), आकाश सुभाष गाडे (वय-२१ रा. सिंहगड रोड, पुणे), गणेश दिलीप म्हसकर (वय-२३ रा. माणिकबाग, पुणे मुळ रा. मुपो अंबी, पानशेत, ता. वेल्हा) अशी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद जामदारे व त्याच्या इतर दोन साथीदारांवर टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक फायद्यासाठी चिथावणी देवून टोळीच्या फायद्यासाठी वडगाव, धायरी, हिंगणे, माणिकबाग, महादेवनगर, सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे व हवेली परिसरात दहशत निर्माण केली आहे.
धमकी देऊन धायरी, हिंगणे व सिंहगड रोड परिसरातील स्थानिक रहिवासी, व्यावसायिक यांना दमदाटी व मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत.
दरम्यान, आरोपींवर कायद्याचा वचक राहावा, यासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे , पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर यांनी मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाची आणि कागदपत्रांची पडताळणी करुन मोक्का कारवाई करण्याचे आदेश डहाळे यांनी दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त परिमंडळ- ३ सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या आदेशानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, महिला पोलीस अंमलदार मिनाक्षी महाडीक, पोलीस अंमलदार स्मित चव्हाण, आणि प्रथमेश गुरव यांच्या पथकाने केली.