पुणे : येरवडा परिसरात दहशत पसरवणाऱ्या ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. ५ जणांच्या या टोळीने दहशत पसरवण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड केली. जुनेद एजाज शेख (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे (वय २१, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या दीपक काळोखे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), निखील ऊर्फ बॉडी जगन्नाथ शिंदे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) व त्यांचा एक साथीदार अशी मोक्का लावलेल्यांची नावे आहेत.
जुनेद एजाज शेख हा टोळीचा म्होरक्या आहे. तर, निखील शिंदे हा सध्या फरार असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. जुनेद शेख व त्याच्या साथीदारांनी २६ डिसेबरला लक्ष्मीनगर येथे येऊन धारधार हत्यारे व दगड घेऊन हवेत फिरवून शिवीगाळ केली होती. या दरम्यान त्यांनी हिंदीत डायलॉगबाजी करत लोकांना धमकाविले. कोई आगे आयेगा तो नही छोंडेंगे, अपने अपने घर जावो, असे ते म्हणाले. तसेच फिर्यादी व त्याचा भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
जुनेद शेख याने तिथल्या स्थानिक गुन्हेगारी टोळी तयार केली होती. टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन नागरिकांच्या मनात त्याने भिती निर्माण केली होती. दिवसा, रात्री घरफोडी करणे, गरीब, असहाय्य युवकांना पैशांचे वअमिष दाखवून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना साथीदार बनवून त्यांच्याकडून गुन्हे तो करवून घेत असे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक कांचन जाधव, जयदिप गायकवाड, निगराणी पथकाचे सहायक निरीक्षक महेश लामखडे, पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, तसेच देविदास वांढरे यांनी केली आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्या कार्यकाळातील १११ वी मोक्का कारवाई आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या यांना सादर केला. शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील हे तपास करीत आहेत.