हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : ट्रक्टर एक्सचेंज, खरेदी-विक्रीचा बहाणा करुन तरडे (ता. हवेली) येथील महिलेला बोलण्यामध्ये गुंतवुन त्यांचा मोबाईल फोन दुचाकीवरून हिसकावून नेणाऱ्या एका आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याचा एक साथीदार हा फरारी आहे.
राजु बाळु शेंडगे (वय -३९, रा. मु. पो तरवडी, रानमळा, शेंडगे वस्ती, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे तरडे (वरचे तरडे) गावचे हद्दीत शेतातील रहाते घरी दोन अज्ञात चोरटे मोटारसायकल वर येवुन ट्रक्टर एक्सचेंज, खरेदी-विक्री चा बहाणा करुन महीला फिर्यादी घरी एकटे असल्याचा फायदा धेवून त्यांना बोलण्यामध्ये गुंतवुन त्यांचा मोबाईल फोन हिसकावून चोरून नेल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दिली होती.
सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन त्यांचा अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस पथकातील पोलीस शिपाई बाजीराव वीर व दीपक सोनावणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, “तरडे गावामध्ये महीलेकडुन मोबाईल हिसकावणारा इसमा हा आंबेडकर नगर, नायगाव या ठिकाणी उभा आहे त्याचे अंगावर निळा रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे.”
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सदर चोरट्यास सापळा रचून पकडण्याच्या सूचना दिल्या. सदर ठिकाणी पथक गेले असता त्याला पोलीस आल्याची चाहूल लागली. त्यामुळे त्या ठिकाणावरून पळून जाऊ लगला मात्र तपास पथकातील स्टाफने त्यांचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याला नाव व पत्ता विचारले असता त्याने वरीलप्रमाणे नाव व पत्ता सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंघाने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा आणखी एका जोडीदारासमवेत केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे हे करत आहेत.
दरम्यान, मोटारसायकल वर येवुन ट्रक्टर एक्सचेंज, खरेदी-विक्री चा बहाणा करुन जर कोणाचा मोबाईल किंवा इतर ऐवज चोरट्यानी अशा प्रकारे हिसकावला असेल, तर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्याचे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांनी केले आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गायकवाड, पाटोळे, बोरावके, नागलोत, जाधव, देवीकर, पुंडे, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, पवार, सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.