पुणे : म्हाडाच्या लॉटरीतील २५० लाभधारकांनी सदनिकांचे खरेदीखत करणाऱ्यांच्या बिल्डरने पीएमआरडीएकडून इमारतीच्या रचनात्मक बदल मंजूर करून घेत संबंधित लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार वाघोली येथील संकेत क्रमांक ४८४ (पुणे) येथील गेरा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडमधील म्हाडा २० टक्के समावेशक योजनेअंतर्गत सृष्टी इमारतीत घडला आहे. यामुळे अनेक सदनिकाधारक मिळालेले फ्लॅट रद्द करण्याच्या तयारीत आहे.
याबाबत लाभार्थ्यांनी सांगितले की, इमारतीच्या रचनेत बदल करण्यापूर्वी बिल्डरने रेराच्या नियमानुसार खरेदीखत केलेल्यांची लेखी पूर्वपरवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नसून, त्यांनी परस्पर सोसायटीच्या प्लॅनमध्ये २७ जून २०२२ रोजी बदल केला आहे. फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी रेरा, म्हाडा आणि लाभार्थींना दाखविलेल्या प्लॅनमध्ये इमारतीच्या तिन्ही बाजूने नऊ मीटरची मोकळी जागा सोडली होती. आता ओढ्याच्या बाजूला (पूर्व दिशा) मोकळी जागा कमी करून फक्त ४.५ मीटर ठेवली आहे. यामुळे येथील रहिवाशांना सामुदायिक वापरासाठी, नैमित्तिक गरजांकरता जागा कमी मिळणार आहे. त्यामुळे नवीन मंजूर योजनेतील पूर्वेकडील मोकळी जागा पूर्ववत होईपर्यंत प्रकल्पला स्थगिती द्यावी, अशी खरेदीखत केलेल्यांची मागणी आहे.
दरम्यान, सोसायटीच्या खालील बाजूस असलेला मल्टिपर्पज हॉल कमी करून चार फ्लॅट नव्याने बांधणार आहे. एफएसआयच्या नावाखाली पीएमआरडीएने त्याला मंजुरी दिली आहे, असे सांगण्यात आले आहे. मात्र म्हाडाने लॉटरी जाहीर केली त्यावेळी ३६० फ्लॅटची सोडत काढली होती. त्यानंतर लॉटरी विजेत्यांना रेरा, म्हाडाने दाखविलेल्या प्लॅननुसार सर्वांनी कारार केले. त्यानंतर सर्वांना अंधारात ठेऊन इमारतीचा पूर्ण प्लॅन बदललाच कसा? त्यातच सोडत झाल्यानंतर अचानक ४ फ्लॅट कसे काय वाढले? त्याला म्हाडाकडून परवानगी घेतली का? असे अनेक प्रश्न सदनिकाधारक उपस्थित करत आहेत.
सुविधांसाठी जागाच नाही
करार करताना इमारत परिसरात गार्डन लॉन इन ओपन स्पेस, आणि चिल्ड्रन प्ले एरिया अशा सुविधा दिल्या आहेत. मात्र पार्किग प्लॅनमध्ये कोठेही गार्डनचा उल्लेख नसल्याने गार्डनबाबत प्रश्नचिन्हच आहे. गार्डन नसेल तर येथील रहिवाशांची लहान मुले कोठे खेळणार, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार की नाही? त्यातच सृष्टीच्या आवारात हे बांधायचे असेल तर त्यासाठी आवश्यक जागाही बिल्डरने शिल्लक ठेवलेली नाही.
याबाबत बोलताना सृष्टी वाघोली येथील सदनिकाधारक रणवीर देशमुख म्हणाले की, म्हाडासोबत व गेरा बिल्डरसोबत या प्रकल्पापातील सोयीसुविधांबाबत ७-८ बैठका विविध विषयावर घेण्यात आल्या आहेत. त्यावेळी सर्वांना प्रोजेक्टमधील सोयीसुविधा विषयी माहिती देण्याबाबत कॅम्प आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यावेळी बिल्डरने तो घेण्यात येईल असे सांगितले. मात्र तो अद्यापही घेतलेला नाही. त्यातच पुन्हा बिल्डरने प्लॅनमध्ये बदल केला जात असल्याने ही एकप्रकारे फसवणूक आहे. त्याबाबत संबधित बिल्डरवर सदनिका धारकांच्यावतीने फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना सृष्टी वाघोली येथील सदनिकाधारक शिवाजी सानप म्हणाले की, प्लॅनमध्ये सदनिकाधारकांच्या फ्लॅटमध्ये पार्टिशन दाखविण्यात आले होते. परंतु संबधित बिल्डरने हे बांधकाम करत असताना व खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पार्टिशन काढून टाकले आहे. त्यावरही सदनिकाधारकांनी आक्षेप नोंदवला असून फ्लॅटमध्ये पार्टिशन बसवून देण्याची मागणी केली आहे.