वडगाव मावळ, (पुणे) : मंजूर झालेल्या निविदाच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यावर (वर्ग -३) गुरुवारी (ता. ०५) ही कारवाई करण्यात आली आहे.
अंकुश किसन खांडेकर (वय – ५८, विस्तार अधिकारी, (वर्ग- ३), पंचायत समिती, वडगाव मावळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय साईट मॅनेजरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जागृती एंटरप्राइजेस मध्ये साईट मॅनेजर म्हणून काम करतात. जागृती एंटरप्राइजेसचे अंतर्गत बारा व्हॅट सोलर स्ट्रीट लाईट वर्क ऑर्डर चे काम लोहगड येथे चालू करायचे आहे. त्या संदर्भाने ग्रामपंचायत लोहगड अंतर्गत शुल्क अनुदानातून निविदा जागृती एंटरप्राइजेसच्या नावाने मंजूर झालेली होती.
त्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी अंकुश खांडेकर याने ४० हजार रुपयांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागीतली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी अंकुश किसन खांडेकर हा ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयात पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.