न्हावरे : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील क्रिकेट स्पर्धेदरम्यान गोळीबार,दगडफेक आणि मारहाण करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या टोळी प्रमुखाला शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी पथक) जेरबंद केले आहे. योगेश केशव मचाले (वय-३१, रा.मांडवगण फराटा, ता.शिरूर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे फरार आरोपीचा शोध घेण्यात शिरूर पोलिसांना यश मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेदरम्यान बॅनरवर सूत्रधार शिंदे याचा फोटो न लावल्याच्या कारणावरून फिर्यादी आणि सूत्रधार शिंदे यांच्यात वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी योगेश मचाले व मिनीनाथ गव्हाणे यांनी मध्यस्थी केली. मात्र, त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र ऋषिकेश सकुंडे व राहुल गिऱ्हे हे तेथून निघून जात असताना भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित असलेल्या अक्षय पाटील व पप्पू करड यांनी फिर्यादीशी वाद घातला.

या वादातून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलामधून राऊंड फायर केल्याचा तसेच फिर्यादी ग्राउंडवरून पळून जात असताना सूत्रधार शिंदे, ऋतिक चव्हाण, योगेश मचाले, दिगंबर शेंडकर यांच्यासह अन्य चार ते पाच जणांनी फिर्यादीच्या दिशेने गोळीबार करून दगडफेक आणि मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला असून, याप्रकरणी योगेश मचाले सुमारे सात महिन्यापासून फरार असल्यामुळे मचाले याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे शिरूर पोलिस फरार योगेश मचालेचा शोध घेत होते. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा
या गुन्ह्यातील टोळीप्रमुख योगेश केशव मचाले हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे सात महिन्यांपासून फरार होता. तो खांडवेनगर, वाघोली परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार विनोद मोरे व पोलीस अंमलदार सुशील सुरवसे यांना माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी खांदवेनगर-वाघोली परिसरात जाऊन सापळा रचला. आरोपी योगेश मचाले तेथे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर योग्य संधीची वाट पाहून पोलिसांनी त्याला शिताफीने जेरबंद करून ताब्यात घेतले.
गंभीर गुन्ह्यांची नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या योगेश केशव मचाले याच्याविरुद्ध खंडणी, मारहाण तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार विनोद मोरे, राहुल भवर, शरद वारे, अक्षय काळमकर, पोलीस अंमलदार सुशील सुरवसे, निखिल रावडे, दादाराव नागरे, नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोई, अंबादास थोरे, अजय पाटील, रविंद्र काळे आणि वैभव शेलार यांनी सहभाग घेतला. सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात शिरूर पोलिसांना यश आल्याने या गुन्ह्याच्या पुढील तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.






