पुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या 35 वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी, 10 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे मृत पर्यटकाचे नाव असून, ते मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील आणि सध्या पुण्यातील भेकराईनगर, हडपसर येथे वास्तव्यास होते. पुण्यातून तीन युवक राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिज्ञेश हे मित्रांसोबत पाल बुद्रुक मार्गाने राजगड किल्ला चढत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. ही बाब लक्षात येताच किल्ल्यावर उपस्थित असलेल्या पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी विशाल पिलावरे आणि दीपक पिलावरे, स्थानिक नागरिक शंकर रसाळ, आकाश जाधव, लहू खरात, महावितरण विभागाचे कर्मचारी तसेच इतर पर्यटकांनी त्यांना मदत करण्यासाठी धाव घेतली.
जिज्ञेश यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली. त्यानंतर स्ट्रेचरच्या साह्याने त्यांना किल्ल्यावरून खाली आणण्यात आले आणि वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर शिवाजी कुरणकर यांनी घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, किल्ला चढताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.
या दुर्दैवी घटनेतील आणखी एक हृदयस्पर्शी बाब समोर आली आहे. जिज्ञेश यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता. जिज्ञेश बेशुद्ध पडल्यानंतर आणि त्यांना खाली आणण्याची धडपड सुरू असतानाही हा कुत्रा त्यांच्या जवळच राहिल्याचे दिसून आले. या दृश्यातून मुक्या प्राण्याचे आपल्या मालकावरील प्रेम आणि निष्ठा अधोरेखित झाली.
या संपूर्ण घटनेत पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, महावितरणचे कर्मचारी आणि इतर पर्यटकांनी केलेले मदतीचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास वेल्हे पोलीस करत आहेत.







