Manchar News | मंचर, (पुणे) : भरदिवसा उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. २९) घडली आहे. पारगाव (ता. आंबेगाव) येथील तनिष्का मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे.
राजाराम कोंडिबा थोरात (वय – ६०, पारगाव, ता. आंबेगाव) असे जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजाराम कोंडिबा थोरात हे शेतकरी असून ते पारगाव फाट्याजवळ कौठ मळा येथे राहतात. त्यांची तनिष्का मंगल कार्यालयाजवळ उसाची शेती आहे. दुपारी ते उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
बिबट्याने शेतकरी थोरात यांच्या दोन्ही हातांना व पायांना पंजा मारून जखमी केले. अचानक हल्ला झाला तरी देखील प्रसंगावधान राखून थोरात यांनी बिबट्याला पळवून लावले. या घटनेची खबर वनविभागाला मिळताच वनरक्षक साईमाला गीते घटनास्थळी हजर होऊन जखमी राजाराम थोरात यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे व माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी जखमी राजाराम थोरात यांची विचारपूस केली. परिसरात मागील महिन्यात मेंढपाळावर झोपेत असताना बिबट्याने हल्ला केला होता, परंतु वन विभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने शेतकरीवर्गात घबराट पसरली आहे.