Manchar News : मंचर, ता.११ : बिबट्याने आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या मुलाला ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील फुटाणेमळ्यात बुधवारी (ता.११) पहाटेच्या सुमारास घडली आहे. मात्र आईने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या हल्ल्यातून पोटच्या गोळ्याला वाचविले आहे. त्यामुळे ती फक्त आईच करू शकते. याचा प्रत्यय आंबेगावकरांना आज आला आहे.
पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी
देवा धोंडीभाऊ करगळ असे वाचलेल्या मुलाचे नाव आहे. तर सोनल धोंडीभाऊ करगळ असे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविलेल्या मातेचे नाव आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात हा छोटा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फुटाणेमळा येथील सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊकरगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिचा आठ महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याचे बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता देवा या मुलाचा हात अंथुरणाच्या बाहेर आला होता. तेव्हा बिबट्याने हल्ला करण्याच्या उद्देशाने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सोनल करगळ यांना अचानक जाग आली.
तिने पहिले असता, मुलाच्या हाताला ओढत असलेल्या बिबट्या आढळून आला.त्यानंतर सोनल यांनी तातडीने बिबट्याला प्रतिकार केला. एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. या दरम्यान जोरजोरात आरडाओरडा केला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनीही आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात आठ महिन्याचा मुलगा देवाच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी, बिबट रेस्क्यू सदस्य यांनी मेंढपाळ कुटुंब यांना धीर दिला. आणि मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलावर मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन कर्मचाऱ्यांनी सकाळी येऊन घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
याबाबत बोलताना मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस म्हणाल्या की, हा परिसर बिबट्या प्रवन क्षेत्र असल्यामुळे मेंढपाळांनी रात्रीच्या वेळेस झोपताना खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी विजेची व्यवस्था असेल त्या ठिकाणी झोपावे च कुटुंबातील सदस्यांनी राखणदारी करावी. असे आवाहन राजहंस यांनी केले आहे
दोन दिवसापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू
दोन दिवसापूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता आंबेगाव तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे.