हडपसर, (पुणे) : मांजरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनोळखी महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत “पुणे प्राईम न्यूज”ने सदर आरोपी व मयत महिला यांच्या व्हिडिओसह बातमी प्रदर्शित केली होती. या व्हिडिओ व बातमीची जोरदार चर्चा या परिसरात झाली. त्यामुळे आरोपी हडपसर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी पुणे प्राईम न्यूजच्या बातमीला दुजोरा देऊन अभिनंदन केले. विक्रम ऊर्फ बाळू रघुनाथ जाधव, (वय ३०, रा. मुळगाव महाळंग्रा, ता. चाकुर जि. लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी रेल्वे स्थानकाबाहेर एका अज्ञात महिलेचा मांजराई व्हिलेज या ठिकाणी 7 एप्रिलला अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बेवारस मृतदेह आढळून आला होता. सदर महिलेचा गळा दाबुन खून करण्यात आल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एक महिना झाला तरी माहिती मिळत नसल्याने पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी बातमीच्या माध्यमातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच या व्हिडीओतील आरोपी व मयत महिलेची माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना मयत महिलेस सिरम इन्स्टिट्यूट येथून मांजरी रेल्वे स्टेशनपर्यंत शेअर रिक्षामध्ये घेऊन गेल्याचे दिसून आले. या रिक्षावर असलेल्या जाहिरातीवरून ३०० रिक्षांची माहीती घेतली. त्यातून आरोपीने प्रवास केलेली रिक्षा शोधून चौकशी करण्यात आली. दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत संशयित इसम हा यवत भागात राहत असल्याची माहिती तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे यांना मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या बातमीवरून हडपसर तपास पथकाने सदर भाग पिंजुन काढत दाखल गुन्ह्यातील आरोपी विक्रम ऊर्फ बाळू रघुनाथ जाधव याला शनिवारी (ता. ११) ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते हे करीत आहेत.