Mahableshwar News : महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याचे कातडे व वाघ नखे यांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तिघांना सापळा रचून मुंबई पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किंमतीचे वाघाचे कातडे व नखांचा पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला. या तिघांवर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा लाखांचा मुद्देमालही जप्त
पोलिस कर्मचारी संदीप आनंदराव परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सुरज लक्ष्मण कारंडे (वय 30 रा. बिरवाडी, ता.महाबळेश्वर), मोहसीन नजीर जुंद्रे (वय 35, रा. रांजणवाडी महाबळेश्वर) व मंजुर मुस्तफा मानकर (वय 36 रा. नगरपालिका सोसायटी महाबळेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, महाबळेश्वर येथील काही लोक वाघाच्या कातड्याची व त्याच्या वाघ नखांची तस्करी करण्यासाठी एलआयसी मैदान बोरीवली पश्चिम येथे येणार आहेत. (Mahableshwar News) बोंबे यांनी ही माहिती आपले वरिष्ठ अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन शिंदे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना दिली. या दोन्ही अधिकारी यांनी ही माहिती पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांना दिली. पोलिस उपायुक्त बन्सल यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
वरिष्ठांकडून आदेश मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचला. वाघाचे कातडे व नखे विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना शिताफीने जेरबंद केले. (Mahableshwar News) या तीन आरोपींकडून वाघाचे सोलून काढलेले काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले 114 सेंटीमीटर लांब व 108 सेंटीमीटर रूंद वाघाचे कातडे त्यासोबत 12 वाघनखे असा साधारण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामध्ये एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यातील सपोनि भालचंद्र शिंदे, पोउनि अखिलेश बोंबे, पोलिस हवालदार प्रविण जोपळे, संदीप परीट, पोलिस शिपाई प्रशांत हुबळे व गणेश शेरमळे यांनी सापळा रचून आरोपिंना जेरबंद करण्यात मोठी महत्वाची कामगिरी बजावली.
महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघांचे अस्तित्व
महाबळेश्वरच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत. परंतु, पट्टेरी वाघ दिसत नाही. वन विभागाचे अधिकारी देखील आपल्या जंगलात पट्टेरी वाघ नाहीत, असे सांगतात. (Mahableshwar News) परंतु या शिकार प्रकरणाने महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत, हे सिध्द होत आहेत. यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला पार गावाच्या शिवारात ब्लॅक पँथर काही लोकांनी पाहिला होता. परंतु, त्यानंतर तो पँथर देखील पुन्हा दिसला नाही.