सासवड : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दाम दुप्पट परतावा, दरमहा 5 टक्के उत्पन्न आणि प्रिलॉन्च TLC 2.0 कॉईनवर 40 टक्के बोनस मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल 21 लाख 75 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे पुरंदर तालुक्यातील क्रिप्टो गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी हर्षदा अमोल मु-हे (रा. शिरवळ, जि. सातारा) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम जगताप, संतोष कटके, संकेत इनामके, अनिता प्रकाश जगताप (सर्व रा. सासवड) आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणुकीच्या कलमांसह महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम-2019 आणि प्राईज चिट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम्स (बंदी) अधिनियम-1978 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी TRILLIONER या दुबईस्थित कंपनीच्या TLC 2.0 या प्रिलॉन्च क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सप्टेंबर 2024 मध्ये दिला. गुंतवणुकीवर 40 टक्के कॉईन, दरमहा 4 ते 5 टक्के परतावा तसेच भविष्यात कॉईनची किंमत अनेकपटीने वाढेल, असे सांगून विश्वास संपादन करण्यात आला. कंपनीचे सेमिनार, व्हिडिओ, वेबसाइट आणि मोबाईल अॅप दाखवून गुंतवणूक सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला काही महिन्यांचा परतावा देऊन विश्वास अधिक दृढ करण्यात आला. त्यानंतर अधिक गुंतवणुकीसाठी दबाव टाकत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपये गुंतवून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एकूण 21.75 लाखांची गुंतवणूक स्वीकारल्यानंतर आरोपींनी काही काळ मर्यादित परतावा दिला. मात्र मे 2025 नंतर परतावा बंद झाला.
पैसे मागितल्यानंतर “कंपनीचा सर्व्हर बंद आहे”, “मार्केट डाऊन आहे”, “नंतर पैसे मिळतील” अशी कारणे देत टाळाटाळ करण्यात आली. अखेरीस मूळ रक्कमही परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. या योजनेत भाग्यश्री किरण भरगुडे, दुष्यंत चंद्रकांत वाघमारे यांच्यासह पुरंदर तालुक्यातील अनेक नागरिकांनीही गुंतवणूक केल्याचा उल्लेख फिर्यादीत असून, आणखी फसवणूकग्रस्त समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस करत आहेत.







