Loni Kalbhor Traffic Police News लोणी काळभोर : पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाची वेळ ही सकाळी आठ ते रात्री आठ अशी बारा तासांची आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी एक टक्का अपवाद वगळता वाहतूक शाखेतील 99 टक्के वाहतूक कर्मचारी ठरलेल्या वेळेत व वरिष्ठांनी नेमून दिलेल्या जागेवर वाहतूक नियमन करत असतात. मात्र, शहर पोलिसांच्याच अखत्यारीत असलेला लोणी काळभोर वाहतूक पोलिस विभाग याला अपवाद ठरतो आहे. काही ठराविक वाहतूक पोलिस कर्मचारी सोडले तर, लोणी काळभोर पोलिसांचा वाहतूक विभाग म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा…’ असा प्रकार ठरत आहे. (Loni Kalbhor Traffic Police News)
लोणी काळभोर वाहतूक पोलिसांपैकी 60 टक्क्यांहून अधिक कर्मचारी, पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाची वेळ पाळत नसल्याची बाब पुढे आली आहे. वरिष्ठांनी नेमून दिलेल्या जागेवर जाऊन, संबंधित ठिकाणी सकाळी आठपासून वाहतूक नियमन सुरु होणे अपेक्षित असताना लोणी काळभोर वाहतूक विभागातील काही पोलिस त्यांच्या वेळेनुसार येत नसल्याची बाब मागील आठ दिवसांच्या गोपनीय पाहणीत पुढे आली आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे वाहतूक नियमनासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी बहुसंख्य वाहतूक पोलिस कर्मचारी ‘वेगळ्याच’ कामात दंग असल्याची बाबही या पाहणीत पुढे आली आहे. (Loni Kalbhor Traffic Police News)
लोणी काळभोर वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या पुणे-सोलापुर महामार्गावर गोपनीय पाहणी केली असता, लोणी स्टेशन, एनआयटी कॉर्नर चौक, थेऊरफाटा चौक, नायगाव चौक व उरुळी कांचन हद्दीतील एलाईट व तळवाडी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहनांची गर्दी असतानाही वाहतूक पोलिस वेगळ्याच कामात असल्याचेही पुढे आले आहे. लोणी स्टेशन चौकात सकाळी व दुपारी तीनच्या दरम्यान शाळेच्या मुलांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, या ठिकाणचे पोलिस कर्मचारी निवांत म्हणजे साडेनऊ-दहानंतर आपल्या वेळेनुसार हजर होत असल्याची रोजचीच ओरड आहे. तर सायंकाळी सहानंतर पुणे-सोलापुर महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढते. (Loni Kalbhor Traffic Police News)
वास्तविक, या कालावधीतच वाहतूक पोलिसांनी चौकात थांबून नियमन करणे अपेक्षित असताना सायंकाळी सहानंतर पोलिस दिसतच नाहीत. एमआयटी कॉर्नरला एमआयटीच्या मुलांमुळे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत हा चौक वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय धोकायदायक वाटावा, अशीच परिस्थिती असते. मात्र, येथील पोलिस कर्मचारी वाहतूक नियमन करतात की नाही याचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Loni Kalbhor Traffic Police News)
थेऊरफाट्यावरील परिस्थिती अत्यंत भयावहच !
रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिक्षा धोकायदायक पद्धतीने उभ्या असतानाही एकही वाहतूक पोलिस कारवाई करायला धजावत नाही हेच भयाण चित्र नागरिकांना रोजच पाहावे लागत आहे. थेऊरफाट्यावरील परिस्थिती तर खूप भयानक बनली आहे. चौकातील सर्वच दुकांनदारांनी आपापली दुकाने रस्त्यातच वाढवण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. यामुळे अरुंद झालेल्या चौकात वाहने चालवणे ही बाब अतिशय कठीण बनली आहे. त्यातच या ठिकाणचे वाहतूक पोलिस नियमन करण्याऐवजी रेल्वेपुलाच्या पुढे जाऊन ‘वेगळ्याच’ कामात दंग असल्याचे दिवसभर नागरिकांना पाहावे लागत आहे. (Loni Kalbhor Traffic Police News)
नागरिकांची पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी
उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकात मुख्य रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणारी वाहने, तीन व सहा आसनी रिक्षा रस्त्याच उभ्या राहत असल्याने हा चौक पुणे-सोलापुर महामार्गावरील सर्वांत मोठा वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध झाला आहे. तळवाडी चौकाच्या दोन्ही बाजूला एक-दोन किलोमीटर रांगा लागल्याशिवाय उरुळी कांचन ग्रामस्थांना करमत नाही, अशीच अवस्था निर्माण झाली आहे. या ठिकाणची रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करण्याऐवजी त्या ठिकाणचे वाहतूक पोलिस वेगळ्याच कामात दंग असल्याचे चित्र आहे. याबाबत वारंवार आवाज उठवूनही परिस्थितीत फरक पडत नसल्याने कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचन हद्दीतील नागरिक वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. (Loni Kalbhor Traffic Police News)
पोलिसांनो, जरा इकडे पण लक्ष द्या…
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शालेय विद्यार्थी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत बिनधास्त वाहन चालवत आहेत. केंद्र शासनाने वाहतूक नियमभंग कायद्यात वाढ केली असली तरी त्याची अंमलबजावणी लोणी काळभोर शहरात होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून सर्रास नियमांची पायमल्ली केली जात आहे. कर्णकर्कश व चित्र-विचित्र आवाज करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. बुलेटला जास्त आवाज करणारे सायलेन्सर बसविले जातात.
बुलेटच्या कर्णकर्कश आवाजामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांवर धडकी भरण्याची वेळ आली आहे. बुलेटचालक वाहनातून जोरजोरात व अचानक फटाक्यांचे आवाज काढतात. त्यामुळे वयस्कर मंडळी व लहान मुले या आवाजाने घाबरून आहेत, अशा वाहनचालकांवर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. (Loni Kalbhor Traffic Police News)