लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाच्या व्यवहारात ५ लाख रुपयांचा अपहार करून तब्बल ५ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या एका आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी वाघोली (ता. हवेली) येथून अटक केली आहे.
अश्रफ अमजद सय्यद (वय २९, रा. वाघेश्वरनगर, गोरेवस्ती वाघोली पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निखील गुलाब कुंजीर वय २९ वर्ष धंदा व्यवसाय, रा. कुंजीरवाडी पानमळा, रोड ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील कुंजीर आणि आरोपी अश्रफ सय्यद हे दोघे एकमेकांचे ओळखीचे होते. फिर्यादी निखील यांनी हडपसर येथील पोपट भोलाजी ढवळे यांना ५ लाख रुपये देण्यासाठी आरोपी अश्रफ याच्याजवळ १ फेब्रुवारी २०२२ ला मोठ्या विश्वासाने दिले होते. परंतु, आरोपी अश्रफने कुंजीर यांचा विश्वासघात करून सदर रकम पोपट ढवळे यांना न देता अपहार केला. आणि आरोपी अश्रफ सय्यद हा फरार झाला होता. याप्रकारणी कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सय्यद याच्याविरोधात तक्रार दिली. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अमित गोरे यांच्या पथकाला सूचना दिल्या.
सदर पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलीस नाईक संभाजी देविकर व बाजीराव वीर यांना पाच लाख रुपयांचा अपहार केलेला आरोपी अश्रफ सय्यद हा वाघोली येथे येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला.परंतु, आरोपी अश्रफ सय्यद याला पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला. मात्र,पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी अश्रफ सय्यद याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक देशमुख करीत आहे.
ही कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव वीर शैलेष कुदळे आणि निखील पवार यांच्या पथकाने केली आहे.