लोणी काळभोर : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदानाच्या परिसरातून शनिवारी (ता.२३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
सौरभ गोविंद इंगळे (वय २२ वर्षे, रा. इराणी गल्ली, इराणी मशिद जवळ पठारे वस्ती, कदमवाकवस्ती ता.हवेली जि.पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितनुसार, पुणे जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आरोपी सौरभ इंगळे हा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदानाच्या परिसरातून फिरत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेश दराडे यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. परंतु, आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला. मात्र पोलिसांनी आरोपी इंगळेचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी सौरभ इंगळे याच्यावर शरीराविरुदधचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीला २५ ऑगस्ट २०२१ पासून २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केले होते. आरोपी इंगळे याला अटक केल्यानंतर त्याच्या विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हि कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, संतोष होले, पोलीस राजेश दराडे आणि महीला पोलीस कर्मचारी विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे..