Loni Kalbhor News | लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, लॉजचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंग, चारचाकी वाहने व पानटपऱ्यांचे सेवा रस्त्यांवरील वाढलेले अतिक्रमण, मद्यपींचा वाढता वावर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या परिसरात वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढत आहेत.
संबंधित हॉटेल्स, बार, लॉजमध्ये येणारे ग्राहक मद्यपान करून रस्त्यावरच धिंगाणा घालतात. त्यातून शिवीगाळ, भांडणे होतात. महामार्गालगतच्या अनेक बार, लॉजच्या परिसरात गैरप्रकार वाढले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून ये-जा करणारी वाहने तेथेच थांबतात. रात्रीच्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण मद्यपान करून महामार्गावर स्टंटबाजी करतात त्यातून अपघात होत आहेत.
पुणे – सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन परिसरात शेकडो हॉटेल आहेत. तसेच अजूनही अनेक नवीन हॉटेलची कामे सुरु आहेत. यामध्ये कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात हॉटेल सरासरी ७० ते ७५ व लॉज ३, बार १५ तसेच थेऊर फाटा ते उरुळी कांचन परिसरात शेकडो हॉटेल्स असून लॉजची संख्या वाढताना दिसून येत आहे. तसेच बारची संख्या हि वाढत चालली आहे.
हॉटेल, लॉज, बार, रेस्टॉरंटमध्ये येणारे ग्राहक सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करतात. अनेकदा दोन ते तीन लेनमध्ये वाहने बेकायदा लावली जातात. अनेक हॉटेल, लॉज, बारचे पार्किंग तसेच, त्यांच्या पानटपऱ्या, छोटी दुकाने, पत्र्याचे शेड, सेवा रस्त्यावर आहे. या रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांना सेवा रस्ता पुरेशा प्रमाणात वापरण्यास मिळत नाही. परिणामी बहुतांश नागरिक थेट महामार्गावरूनच दुचाकी, चारचाकी वाहने पुढे नेतात.
दरम्यान, पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात वाढत चाललेले नागरीकरण व वाढते शहरीकरण यामुळे रोजगाराच्या निमित्ताने अनेक नागरिक या परिसरात वास्तव्यास आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाणे हे ग्रामीण पोलीस दलातून शहर पोलीस दलात समाविष्ठ होऊन दोन वर्ष होत आहे.
परंतु अवैध व्यवसाय हे कमी होण्यापेक्षा त्यामध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे. या बदलाने या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायांवर कारवाई होऊन आळा बसेल अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. वाढत्या अवैध धंद्यामुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरुण व्यसनाच्या आहारी..!
पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे, मात्र संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगणमत असल्याने याबाबत तक्रार करायची कोठे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
गावोगावी काही तरुण व्यसनांसह अवैध मटक्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मटक्यातून अनेक वेळा वर्चस्ववादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. यास प्रतिबंध करणारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत.
मागील तीन ते चार महिन्यात कोणतीही मोठी कामगिरी नाही..!
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस येऊन उरुळी कांचनसह परिसरात गोवा विकणाऱ्या, लोणी काळभोर परिसरात जुगार खेळणाऱ्या तसेच मटका घेणाऱ्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करीत आहेत. तर लोणी काळभोर पोलीस महिन्यातून एकदा कोठेतरी गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या एखाद्या ठिकाणी छापा टाकून त्यातूनच वाहवा मिळवत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे रामनवमी उत्साहात साजरी..!