Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : टोळीतील सदस्याला मारहाण केल्याचा बदला खून करून घेण्यासाठी आलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांचा कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून काढला आहे. पोलिसांनी आरोपींकडून कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पालखी स्थळ परिसरातून पिस्तूल आणि घातक हत्यारासह अटक केली आहे.
प्रणव भारत शिरसाठ, (वय २२, रा. आंग्रे वस्ती, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली), अभिजीत अभिमन्यु आहेरकर, (वय २२, रा. कन्या शाळेजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली), तर अभिषेक दत्तात्रय रामपुरे, वय २१, रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीमध्ये रिमांड सुनावली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक रामपुरे हा आरोपी प्रणव शिरसाट या टोळीचा सदस्य असून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तर आरोपी अक्षय कांबळे हा सुद्धा एक अट्टल गुन्हेगार आहे. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी आरोपी अभिषेक रामपुरे व अक्षय कांबळे यांची काही कारणावरून बाचाबाची झाली होती. त्यावेळी आरोपी अक्षय कांबळे याने आरोपी अभिषेक रामपुरे याला मारहाण केली होती.
रामपुरे हा प्रणव शिरसाट याच्या टोळीचा सदस्य असल्याने पुन्हा मोठी भांडणे होऊन गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडू शकतो. अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने चव्हाण यांनी वरील आरोपींवर पाळत ठेवण्याच्या सुचना पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या पथकाला दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस अंमलदार बाजीराव वीर यांना शुक्रवारी (ता. ३०) त्यांच्या एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, तडीपार असलेला प्रणव शिरसाट व त्याचे टोळीचा तडीपार सदस्य अभिजीत आहेरकर हे पिस्टल व कोयत्या सारखी घातक हत्यार जवळ बाळगुन कोणतातरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरातील पालखी स्थळ परिसरात फिरत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी सुरु केली असता, आरोपी प्रणव शिरसाट व अभिजीत आहेरकर हे मोटारसायकलवर थांबलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल व लोखंडी कोयता मिळून आला.
दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी इतर टोळी सदस्यांच्या साथीने अक्षय कांबळे याचा खुन करण्याचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक रामपुरे यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडीमध्ये रिमांड सुनावली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार सातपुते, गायकवाड,बोरावके, सायकर नागलोत, जाधव, पवार, कुदळे, शिरगीरे, विर, फणसे यांच्या पथकाने केली आहे.