लोणी काळभोर (पुणे)- हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोणी स्टेशन चौकात वर्षभरापुर्वी झालेल्या अपघातात कवडीपाट येथील दोन “सख्ख्या शाळकरी बहिणीं”चा मृत्यू झाला होता. या अपघातास व अपघातात मृत्युमुखी पडलेल्या त्या दोन बहिणींच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या “समस्या” वर्षभराचा कालावधी उलटुन गेल्यानंतरही “जैसे थे” च असल्याचे दिसुन येत आहे.
लोणी स्टेशन चौकातील वरील अपघातानंतर शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी अपघाताची तत्काळ दखल घेत, पुणे-सोलापुर महामार्गावर पंधऱा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यानचे अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना वाहतुक पोलीस यंत्रणा व रस्ते-महामार्ग विभागाला केल्या होत्या. मात्र सुचना केल्यापासुन एक वर्षाचा कालावधी उलटुन गेल्या नंतरही पुणे-सोलापूर महामार्गावर अपघाताला निमत्रंण देणाऱ्या समस्या कायम असल्याचे चित्र आजही दिसुन येत आहे. खासदार, आमदार साहेबांनी दिलेली मोठमोठी आश्वासने फोल ठरली आहेत.
दरम्यान, लोणी स्टेशन चौकात वर्षभरापुर्वी ( २० ऑगष्ट २०२२ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास) झालेल्या अपघातात कवडीपाट येथील गायत्री नंदकुमार शितोळे (वय.१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय.१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यु झाला होता. गायत्री हि लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. तर लहान बहिण राजश्री हि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होती.
लोणी स्टेशन येथील अपघातानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या टीकेची दखल घेत खासदार अमोल कोल्हे यांनी पंधऱा नंबर ते उरुळी कांचन या दरम्यान अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना वाहतुक पोलीस यंत्रणा व रस्ते-महामार्ग विभागाला केल्या होत्या. मात्र १ वर्ष उलटल्यानंतरही पुणे-सोलापूर महामार्गावरील समस्या कायमच आहेत. त्यामुळे खासदार, आमदार साहेबांनी दिलेली मोठमोठी आश्वासने फोल ठरली आहेत.
अपघातानंतर बरोबर आज शनिवारी (ता. १९) पुणे-सोलापुर महामार्गावर पंधरा नंबर ते उरुळी कांचन या वीस किलोमिटर अंतराच्या टप्प्यात “पुणे प्राईम न्यूज” ने पाहणी केली असता, वाहतुक कोंडीबरोबरच, छोट्या-मोठ्या अपघाताला कारणीभुत ठरणारे सर्वच घटक आजही जैसे थे असल्याचे आढळुन आले. लोणी काळभोरसाठी स्वतंत्र चाळीसच्या आसपास वाहतूक पोलिस असतांनाही, वाहतूक पोलिस, पठाणी वसुलीत दंग असल्याने, आजही चौकाचौकात वाहतुकीची कोंडी होणे ही बाब पुर्व हवेलीमधील नागरिकांच्या पाचवीलाच पुजली असावी अशी परिस्थिती दिसुन आली.
महामार्ग व सेवा रस्त्यावर अवैध पार्किंग…!
पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाहने पार्किंग करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्ग पोलीस तसेच हायवे प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करताना दिसून येत नाही. त्यामुळे महार्गावर वाहनचालकालाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला दिवसभर आपली वाहने पार्किंग केलेली असल्याने आतापर्यंत अनेक अपघातही या ठिकाणी घडले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस हळहळ व्यक्त करून पुन्हा त्याच ठिकाणी वाहने पार्क केली जात आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावरील वर्षभरानंतरही कायम असलेल्या समस्या-
१) टोलची मुदत संपली अन रस्त्यावर पडलेले खड्डे
२) रस्त्यावर अतिक्रमणासह अनेक अडथळे,
३) महामार्गाच्या दोन्ही बाजूला मातीचा खच,
४) लोखंडी जाळ्या मोडलेल्या अवस्थेत तर कमी उंचीचे रस्ता दुभाजक,
५) पावसाळ्यात महामार्गावरच पाणी साचणे,
६) महामार्ग व सेवा रस्त्यावर अवैध पार्किंग,
७) रस्त्यावरील धुळीमुळे नागरीक व वाहनधारक हतबल
८) ठिकठिकाणी तुटलेले लाईट कटिंग बॅरिअर,
९) धोकादायक स्थळी हायमास्ट दिवे,
१०) अपघातसमयी महत्वाचे असलेल्या दूरध्वनी क्रमांकांच्या पाट्या गायब,
११) महामार्गाला ड्रेनेजची व्यवस्था नाही
याबाबत बोलतांना “प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघा” चे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब काळभोर म्हणाले, हा रस्ता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) विभागाकडे असला तरी, त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.
रस्त्यालगत वाढलेली हॉटेल, ढाब्यांची संख्या, त्यामध्ये राजरोसपणे होणारी अवैध दारूविक्री, काही हॉटेल व्यावसायिकांच्या भल्याचा विचार करून हॉटेलसमोर रस्त्यावर घातलेले गतिरोधक, लोकांनी सोईसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्तादुभाजक, व्यावसायिकांनी बेकायदा मुख्य रस्ता व सेवा रस्त्याला जोडण्यासाठी मुरूम टाकून तयार केलेला जोड रस्ता व सेवा रस्त्यावर वाढलेले नागरिकांचे अतिक्रमण यांसारख्या अनेक गोष्टी वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत.
याचबरोबर रस्त्यावर वाहने थांबविणे, दारू पिऊन वाहने चालविणे, लेनची शिस्त न पाळणे यामुळेही अपघातास आमंत्रण मिळत आहे. यामुळे या गोष्टींना आळा घालून चालकांमध्ये प्रबोधन करण्या बरोबरच बेकायदा गोष्टींना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.