Shirur News : लोणी काळभोर, (पुणे) : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील व्यंकटेश साखर कारखान्यातून केबल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी अटक केली आहे.
५ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
महाजन राम समुच यादव (रा. खोपाली ता. खालापूर जि. रायगड), मोहम्मद हाफिज मोहम्मद जलिल मन्सुरी (रा. कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ५४ हजार रुपयांची केबल व एका चारचाकी पिकअप असा ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.५) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली की, कासरी फाटा ते निमगाव म्हाळुंगी रोडचे कडेला पांढरे रंगाचे पिकअप वाहन संशयरित्या उभी असून, सदर वाहनांमध्ये चोरीचे केबलचा माल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी पथक गेले असता पिकअपमधील तिघेजण पथकाची चाहूल लागताच पळून जाऊ लागले. त्यानंतर पथकाने पाठलाग करुन २ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या सर्व केबल्स शिक्रापूर येथील व्यंकटेश साखर कारखान्यातून चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून केबल व पिकअप वाहन हे शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून केबल व एक पिकअप असा ५ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठपोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उप निरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलीस उप निरीक्षक तुषार पंदारे पोलीस हवाल्दार जनार्दन शेळके, राजु मोमीन, योगेश नागरगोजे, चंद्रकांत जाधव, अतुल डेरे यांनी केलेली आहे.