Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली आहे.
पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार
शुभम संजय धुमाळ (वय-२२, रा. धुमाळ मळा, म्हस्कोबा मंदीर, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.(Loni Kalbhor News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम धुमाळ हा त्याच्या साथिदारांसह कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, नायगाव फाटा, पुणे सोलापुर रोड परिसरात वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करीत होता. त्यांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट, भिती व मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, आरोपी शुभम धुमाळ याच्या गुन्हेगारी प्रवूत्तीवर कायद्याचा बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख पाठविला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी आरोपी शुभम धुमाळ यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातून २ वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
सदरची कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस नाईक तेज भोसले यांनी केली आहे.(Loni Kalbhor News)