Loni Kalbhor Crime | लोणी काळभोर, (पुणे) : राज्यात गुटखा बंदी असतानाही, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९९ टक्के पानटपऱ्यात मात्र हवा तेवढा गुटखा खुल्या पध्दतीने विकला जात आहे. उरुळी कांचन, लोणी काळभोर, माळीमळा, लोणी स्टेशन हद्दीतील काही पानटपऱ्यात तर गुटख्याची विक्री होलसेल पध्दतीने केली जात आहे. याबाबतची माहिती लोणी काळभोर पोलिसांना असुनही, पोलिस मात्र त्याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. दारु, मटका, गुटखा विक्री, गांजा विक्री यासारख्या सर्वच अवैध धंदे सुरु होत असताना पोलिसांना मात्र ते दिसत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी ठेकेदार आहेत. गुटखा ट्रक- टेम्पोतून आला की कारमधून त्याची रातोरात इच्छितस्थळी ने- आण होते. पोलिसांना या बाबी माहिती असतात. खास लोकांकडून त्याचे वितरण होते. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटकाविक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे गुटखा शौकीनांना सहजरीत्या गुटखा मिळतो. मग गुटखा बंदीला अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आपआपल्या हद्दीतील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत वरीष्ठांनी दिलेले आदेश दिलेले असले तरी, अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील गांजा, मटका, व अवैध धंदे खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे.
पोलिसांकडून जाणीवपूर्वक कानाडोळा…
हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करतांना पाहत असतात. मात्र कारवाई का करत नाही? हा प्रश्न कायमच सतावत आहे. पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. गुटखा विक्रेत्यांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. प्रशासनाकडून अनेकदा दबाव आल्यावर एखाद्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करुन विषयाला बगल दिली जात आहे.
महाराष्ट्र अन्न औषध प्रशासनाने कितीही मोठी धडक कारवाई केली तरी दोन तीन दिवसांनी पुन्हा गुटखा विक्री सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी गुटखा व्यासायिकांनी कायद्याच्या सर्वच नियमांची पायमल्ली करीत आपला अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून येत आहे. उरुळी कांचनला गुटखाबंदी नसल्याच्या आविर्भावात विक्री सुरू आहे. लोणी काळभोर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने अनेकवेळा येथील गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाही केली. तरीही सर्वत्र गुटखा विक्री जोरात सुरू आहे.
पोलिसांकडून तात्पुरती जुजबी कारवाई…
लोणी काळभोर पोलिसांनी व पुणे शहर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उरुळी कांचन येथील एका पान शॉप मधून फक्त ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. लोणी काळभोर पोलिसांकडून एवढी एकच तात्पुरती जुजबी कारवाई केली आहे. त्यानंतर एकही कारवाई झालेली नाही. गुटख्यास बंदी असल्यामुळे कोणीही दराचा विचार करीत नाही. मिळेल त्या किमतीने गुटखा खरेदी केला जात असून किराणा मालाच्या दुकानातूनहि गुटखा पुरविला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!