(Loni Kalbhor )लोणी काळभोर, (पुणे) : पुण्यासह नगर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कामगिरीत पोलिसांनी २ लाख ४३ हजार रुपयांच्या ८ मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
संदिप पोपट केदार, (वय – २१), व राजु गंगाराम दुधवडे, (वय २० रा. दोघेही चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी, जि. अहमदनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दोघांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार…!
पुणे ग्रामीण जिल्हयातील मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने सदरची बाब गांभीर्याने घेवून पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत लक्ष देवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने संदिप केदार व राजु दुधवडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हातील चार मोटारसायकल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी २ लाख ४३ हजार रुपयांच्या ८ मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. सदर आरोपींकडुन नारायणगाव, जुन्नर श्रीगोंदा व पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी १ मोटारसायकल असे एकुण चार मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून मागील महिनाभरात मोटार सायकल चोरीबाबत करण्यात आलेली ही तीसरी मोठी कारवाई करण्यात आली असुन आतापर्यत एकुण १५ लाख ९६ हजार रूपये किंमतीच्या एकुण ४७ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन तीन टोळ्या जेरबंद केल्या आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीण, पोना संदिप वारे, अक्षय नवले, दगडु विरकर, यांनी केली आहे.