लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) परिसरात २० दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची (एचपी) जमिनीखालील पाईपलाईन फोडून इंधनचोरी झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी व कुख्यात इंधनमाफिया प्रविण मडीखांबे, नवनाथ फुले व त्यांच्या आठहून अधिक साथीदारांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ अर्थात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केल्याची माहिती पुढे आली आहे.
‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस केल्याच्या वृत्तास लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. आळंदी म्हातोबाची येथील इंधन चोरी प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत प्रविण मडीखांबे, ईसाक मचकुरी व संकेत शेंडगेसह सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील प्रविणचा मुख्य साथीदार नवनाथ फुले, प्रविणची पत्नी व मुलासह चार आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फऱार आरोपींच्या शोधासाठी पोलिस यंत्रणा काम करत असल्याचेही दत्तात्रेय चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला एचपीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. या इंधन चोरी प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी आत्तापर्यंत प्रविण सिद्राम मडीखांबे, एचपी कंपनीचा सेन्सर व व्हॉल्व्ह ऑपरेटर संकेत शेंडगे, प्रविणचा सहकारी ईसाक ईस्माईल मचकुरी, विशाल धायगुडे, बाळु अरुण चौरे व राजु तानाची फावडे या सहा जणांना यापूर्वीच अटक केली. तर या प्रकरणातील प्रविणचा मुख्य साथीदार नवनाथ फुले, प्रविणची पत्नी दीपाली मडीखांबे, मुलगा हर्षल मडीखांबे व एचपी कंपनीमधील एक कामगार आतीश काकडे हे चार जण फरारी आहेत.
लवकरच मोक्का कारवाईचा आदेश मिळण्याची शक्यता
याबाबत बोलताना लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण म्हणाले, ‘आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून झालेल्या इंधन चोरी प्रकरणात आत्तापर्यंत ४० पेक्षा अधिक हजार लिटर पेट्रोलची चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अटकेत असलेल्या आरोपींनीही याबाबतची कबुली दिली आहे. चोरीच्या पेट्रोलची विक्री करुन आलेले रोख १० लाख रुपये व चोरीतील २४ लाख रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.
प्रविण मडीखांबे व त्याच्या साथीदारांवर अशाचप्रकारचे 10 पेक्षा अधिक गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. यामुळे प्रविण मडीखांबे, नवनाथ फुले व त्यांच्या आठहून अधिक साथीदारांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईची करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. येत्या काही दिवसात मोक्का अंतर्गत कारवाईचा आदेश मिळण्याची शक्यता आहे’.
सारं काही होऊनही कंपनीचे ‘आळीमिळी-गुपचिळी’
आळंदी म्हातोबाची गावच्या हद्दीत प्रविण मडीखांबे व त्याच्या साथीदारांनी पाईपलाईन फोडून दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ पेट्रोल-डिझेलची चोरी केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून २० दिवसानंतरही एचपीच्या अधिकाऱ्यांनी प्रविण व त्याच्या साथीदारांनी नेमकी किती लिटरची इंधन चोरी झाली, याबाबत तोंड उघडलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणातील अनेक धागेदोरे जुळवले आहेत.
मात्र, कंपनीचे धोरण आळीमिळी-गुपचिळी प्रकारचे असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांवर संशयाची सुई फिरु लागली आहे. त्यातच कंपनीच्या दोन कत्रांटी कामगारावर दाखल गुन्हा झाला आहे. तर या प्रकरणात कंपनीचे आणखी दोन कंत्राटी कामगार पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत. असे असतानाही कंपनीचे अधिकारी मात्र गप्प बसल्याने प्रविण व कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधाबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
दीपाली मडीखांबे व नवनाथ फुलेही मुख्य आरोपी
दीपाली मडीखांबे व नवनाथ फुले यांच्या सहभागाबाबत बोलताना दत्तात्रेय चव्हाण म्हणाले, ‘प्रविण मडीखांबे व नवनाथ फुले या दोघांनी एचपी कंपनीतील दोन कंत्राटी कामगारांना हाताशी धरुन इंधन चोराची कट रचला होता. आळंदी म्हातोबाची येथून दोघांनीही इंधनाची चोरी केल्याचे तपासात पुढे आलेले आहे. तर प्रविणची पत्नी व मुलाने चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात या दहाही आरोपींसोबतच आणखी चार जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार तपास सुरु आहे.
इंधन चोरी प्रकरणातील अटकेतील आरोपी
प्रविण सिद्राम मडीखांबे (य ५१ रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), विशाल धानाजी धायगुडे (वय ३१ रा. सिद्राममळा, लोणी काळभोर), बाळु अरुण चौरे (वय ३० रा. सिद्राममळा, लोणी काळभोर), संकेत अनिल शेंडगे (वय २९ रा. फ्लॅट नं. ३०३, माऊली अपार्टमेंट, गुजर वस्ती, कवडीपाट टोलनाका कदमवाकवस्ती, ता. हवेली), राजु तानाजी फावडे (वय ३२, ड्रायवर रा. तुळजाभवानी मंदिराशेजारी, कदमवाकवस्ती, ता. हवेली) ईसाक ईस्माईल मचकुरी वय ४४, रा. फ्लॅट नं. ए २०७, तारा हाईटस, संभाजी नगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली)
फरार आरोपी – नवनाथ फुले (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) आतिश काकडे रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर), दीपाली प्रविण मडीखांबे, हर्षल प्रविण मडीखांबे रा. दोघेही कदमवाकवस्ती, ता. हवेली)