Lonavala Crime लोणावळा (पुणे) : लोणावळा पोलिसांच्या हाती कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना एका अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा तपास करत 24 तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील आपटी धामनदरा या ठिकाणी खुनाचा गुन्हा घडला होता.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास मारुती कोळी (23 ) व गणपत किसन कोळी (30 वर्षे, दोन्ही रा. धामनदरा, कातकरीवस्ती, पवनानगर, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार..!
आपटी धामनदरा मधील धनगरवस्ती येथील स्मशानभूमीजवळील ओढयालगत एका अनोळखी व्यक्तीचा खून केल्याचे समोर आले होते. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्या अंगावरील कपडे काढून, मृतदेह नग्न अवस्थेमध्ये टाकून दिला होता. शनिवारी सायंकाळी ही माहिती दुधीवरेचे सरपंच पांडुरंग घारे यांना मिळताच त्यांना ही माहिती पोलिसांना कळविली.
खून झालेल्या व्यक्तीविषयी कोणतीही माहिती नसताना, हा गुन्हा कोणत्या कारणास्तव घडला असे अनेक प्रश्न असताना तपास करण्याचे व गुन्हा उघडकीस आणण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. त्यासाठी पोलिस तपासी पथके तयार केली.
मृतदेहाची तपासणी केली असता त्याचे फक्त रमेश एवढंच नाव समोर आले. खून झालेला व्यक्ती काय काम करीत होता, त्याचा कोणाशी काय संबंध होता, याबाबत माहिती जमा करून त्याची साखळी जुळवून पोलिसांना तपासात काही धागेदोरे मिळाले. त्या आधारे केलेल्या तपासामध्ये संशयितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.