लहू चव्हाण
पांचगणी : खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे बिबट्याच्या धुमाकुळाने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून गावाच्या मुकाई नावाच्या शिवारात बुधवारी (दि.७) दुपारी दोन शेळ्यांवर बिबट्याने झडप घातली आहे. यामध्ये एक शेळी जागेवर मृत्यू झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी खिंगर गावातील मुकाई नावाच्या शिवारात राजेंद्र नारायण दुधाने यांनी शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. दरम्यान शेळ्यांच्या गोंधळाने दुधाने यांनी धाव घेतली असता त्यांना दोन शेळ्या गवतात गतप्राण झालेल्या दिसून आल्या.
दुधाने यांनी तातडीने शेळ्यांकडे जावून पाहिले तर ऐक शेळी मृत्यू पावल्याचे निदर्शनास आले. तर दुसरी शेळी जखमी अवस्थेत थडपडत होती. त्यांनी तत्काळ परिसरात पाहिले परंतु काहीच आले नाही. त्यानंतर दुधाने यांनी जखमी शेळीला घरी आणून उपचार केले. त्यामुळे त्यांचे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या परिसरात पहिल्यांदाच बिबट्याचा वावर पाहायला मिळाला असून या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्याताच मृत्यू झाल्याचे दुधाने यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.
शेळ्यांवर बिबट्यांचा हल्ला झाल्याने या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.