संदीप टूले
केडगाव : गेल्या महिन्यापासून बिबट्या एकेरीवाडी गलांडवाडी परिसरात वावर वाढला असून, मंगळवारी रात्रीच्या सुमारास दत्तात्रय टकले यांची शेळी बिबट्यांनी फस्त केली. यापूर्वीही बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ले केले आहेत. पण नुकताच बिबट्याने केलेला हल्ला अधिक भयानक आहे, कारण घरासमोरून बिबट्याने शेळी नेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरणं पसरलं आहे.
या भागात बिबट्याची अनेक महिन्यांपासून दहशत कायम आहे. एक महिन्यापूर्वी देखील अशीच एक घटना गावाच्या शिवारात घडली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या भागात ऊसाची शेती अधिक असल्यामुळे बिबट्या अधिक प्रमाणात असल्याचं आढळून येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी नांनगाव परिसरात शेतकऱ्यांवर अनेकदा हल्ला केला होता. त्यामध्ये शेतकरी जखमी झाला होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून अशा घटना गाव परिसरात घडत आहेत. त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे वन विभागाकडून एकच उत्तर मिळतंय ते म्हणजे पिंजरा नाही. पिंजऱ्याची मागणी आम्ही केली आहे. आल्यानंतर आम्ही पिंजरा लावू, अशा उत्तरामुळे नागरिकांनाही वन विभागाच्या उत्तराची सवय झाली आसावी.
आम्ही या घटनेबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवले असून, लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी विनंती केली आहे. कारण रात्री घडलेली घटना ही लोकवस्तीमधील आहे याचे गांभीर्य वन विभागाने ओळखावे.
– विद्या टूले, सरपंच, एकेरीवाडी