मुंबई : ठाणे येथील उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे.आता पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पोलिसांना सहाव्या संशयिताबाबत महत्त्वाची माहिती दिली. घटनेच्या काही वेळ आधी ‘लावण्या’ नावाची तरुणी प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात भेटायला आली होती. आता या तरुणीच्या एंट्रीने या प्रकरणाला नव वळण येणार का हें पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लावण्या या तरुणीचा हल्लेखोरांशी काही थेट संबंध आहे का, किंवा तिला हत्येची पूर्वकल्पना होती का, याचा शोध ठाणे गुन्हे शाखा घेत आहे. यासाठी पोलिसांनी तिला दोन वेळा चौकशीसाठी पाचारण केले असून तिने पोलिसांना काय माहिती दिली, हे अद्याप समोर आलेले नाही.मात्र या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत 3 मुख्य आरोपींना गजाआड केले असून, 6 हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात एका तरुणीचे नाव समोर आल्यामुळे तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरू लागली आहेत.

पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मुख्य शूटरला महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पेण (रायगड) येथील एका डेअरीतून अटक करण्यात आली. हा आरोपी पूर्णेकर यांच्या घराशेजारील वडापावच्या गाड्यावर काम करत होता. त्याच्यासोबत पसार झालेल्या निखिल यादव याच्या दुसऱ्या साथीदाराला अलिबाग येथील डेअरीतून ताब्यात घेण्यात आले. याशिवाय, पूर्णेकर यांचा जुना मित्र आणि सहकारी पप्या शिंदे यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू आणि मुलगा राम पूर्णेकर आपला जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात विशेष तपास पथकातील (SIT) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राम पूर्णेकर यांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. पोलीस आता या राजकीय कोनातूनही शिंदे दांपत्याची प्राथमिक चौकशी करण्याची शक्यता आहे.







