पुणे : राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. मात्र, अनेक मंत्री आणि पालकमंत्री आपापल्या जबाबदारीच्या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. काही मंत्री आपले मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व मंत्र्यांची एक तातडीची बैठक बोलावून त्यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे.

बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सवाल केला की, राज्यात दुष्काळ असताना जबाबदारी असलेले मंत्री संबंधित जिल्ह्यांचे दौरे का करत नाहीत? मंत्र्यांनी केवळ कार्यालयात बसून चालणार नाही, तर तातडीने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, असे आदेश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या नेमक्या व्यथा काय आहेत, त्यांना नेमकी कोणती मदत अपेक्षित आहे आणि त्यांच्यापुढील अडचणी कोणत्या आहेत, याचा सविस्तर आढावा घेऊन एक अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

या दौऱ्यांदरम्यान स्थानिक जिल्हाप्रमुख, आमदार आणि शहरप्रमुखांशी समन्वय साधून प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे आणि तेथील परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देशही शिंदेंनी दिले आहेत. दुष्काळी भागाचा दौरा करून हा अहवाल पुढील 10 दिवसांत सादर करावा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे मदतीचे योग्य नियोजन करून आगामी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना मदत पाठवली जाईल, अशी माहितीही समोर आली आहे.

दरम्यान पालकमंत्रिपदाची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांनी अधिक सक्रिय होऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी जमिनीवर उतरून काम करावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केली आहे.






