शिरूर : शिरूर शहरासह तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज, भररस्त्यात चोरी, मारहाण व लुटमारीचे प्रयत्न आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नेमका आहे तरी किती? पोलीस प्रशासनातील सर्व घटकांमध्ये समन्वय आहे का? उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) यांच्या प्रयत्नांना अपेक्षित सहकार्य मिळत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पूर्वी दिवाळीच्या काळात फटाके आणि टिकल्यांच्या बंदुकीचे आवाज ऐकू येत होते; मात्र, आता प्रत्यक्ष गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आज (ता.१६) पहाटे आनंद सोसायटी परिसरात चोरीच्या प्रयत्नादरम्यान झाडलेली गोळी एका नागरिकाच्या पायाला लागल्याची घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव पुन्हा समोर आणले आहे.

दोन दिवसांपूर्वीही शिरूरमध्ये एका महिलेच्या डोक्याला बंदूक लावून तिच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे का, आरोपींचा शोध लागला का आणि पोलिसांनी कोणती कारवाई केली, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.

डीवायएसपींच्या प्रयत्नांना सहकाऱ्यांची साथ मिळतेय का?
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी डीवायएसपी स्तरावर प्रयत्न होत असताना, प्रत्यक्षात अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. शिरूर विभागातील तीनही पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल आढावा घ्यावा. मागील वर्षभरातील गुन्ह्यांची तपासणी करून प्रकरणे परस्पर मिटवली गेल्याच्या तक्रारींचीही शहानिशा करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
तसेच संशयास्पद कामकाज किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आश्वासनांपेक्षा ठोस कारवाईची अपेक्षा!
तालुक्यात पोलीस-नागरिक संवाद बैठका आयोजित करून नागरिकांच्या तक्रारी ऐकणे, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांच्या मनातील कायद्याची भीती संपत असेल, तर ती पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच आहे.
शिरूरकरांना केवळ आश्वासने नकोत, तर सुरक्षिततेची खात्री देणारी ठोस कृती हवी आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या गंभीर घटनांची दखल घेऊन कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणती पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






