शिरूर : शिरूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उच्चभ्रू आनंद सोसायटीत पहाटे बंदूकधारी चोरट्याने धुमाकूळ घालत उमेश छाजेड (वय 42) यांच्या पायावर गोळी झाडली. मात्र, या थरारात अवघ्या 12 वर्षांच्या मानवी छाजेड हिने वडिलांच्या मदतीला धाव घेत दाखवलेल्या धैर्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित चोरटा आज (ता.16)पहाटे अडीच वाजल्यापासून आनंद सोसायटी परिसरात फिरत होता. याचदरम्यान चारच्या सुमारास पाळीव कुत्र्याला फिरवून घरी परतलेल्या उमेश छाजेड यांना घरात चोरटा दिसला. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. वडील संकटात असल्याचे पाहून मानवीही धाडसाने चोरट्याला रोखण्यासाठी धावली. प्रतिकारामुळे कोंडीत सापडलेल्या चोरट्याने पिस्तुलातून गोळी झाडली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. जखमी छाजेड यांच्यावर येथीलच हार्दे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

चोरीची दुचाकी, पिस्तूल आणि पोलिसांना आव्हान!

विशेष म्हणजे, आरोपी चोरीच्या मोटारसायकलवरून आल्याची माहिती असून, 15 ऑक्टोबर रोजीही त्याने एका महिलेला पिस्तूल रोखून धमकावल्याचे समोर आले आहे. सोसायटीतील सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाला आहे. पोलिसांची गस्त सुरू असतानाही गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरू आहे. असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, गोळीबाराच्या घटनेने शिरूर पुन्हा हादरले असून, आता गुन्हेगारांच्या मुसक्या कधी आवळणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







