पुणे: स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने कात्रज चौकातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी जड आणि अवजड वाहनांना कात्रज चौकात प्रवेशबंदी लागू केली आहे. डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रेलर आणि कंटेनर यांसारख्या वाहनांना या निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

कोणत्या मार्गांवर प्रवेश बंद?
पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या जड वाहनांना शिंदेवाडीपासून पुढे प्रवेश मिळणार नाही. नवीन कात्रज बोगद्याकडून तसेच वारजे परिसरातून कात्रजच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना नवले पुलाजवळ रोखण्यात येणार आहे.

सोलापूरकडून हडपसर, मंतरवाडी आणि कात्रज-कोंढवा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकापुढे प्रवेशबंदी असेल. बोपदेव घाट, मार्केट यार्ड, गंगाधाम, बिबवेवाडी आणि स्वारगेटकडून कात्रज चौकात येणाऱ्या जड वाहनांनाही हे निर्बंध लागू राहतील.

वाहनचालकांनी नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, गराडे, भिवरी, बोपदेव घाट, येवलेवाडी, पिसोळी आणि मंतरवाडी या मार्गांचा परिस्थितीनुसार वापर करावा. दुसऱ्या पर्यायी मार्गात सासवड, चिंबळी आणि वडकी या भागांचा समावेश आहे. प्रवासापूर्वी योग्य मार्गाची खात्री करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
साताऱ्याकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या एसटी बस आणि इतर प्रवासी वाहनांनी नवले पुलाजवळ उजवीकडे वळून कात्रज बायपासमार्गे पुढे जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, वंडरसिटी सोसायटी ते कात्रज बायपास चौक, मोरे बाग, राजस सोसायटी आणि जुन्या कात्रज बोगद्याकडे जाणाऱ्या संबंधित रस्त्यांवर दोन्ही बाजूंना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






