पुणे: पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात परदेशातील नागरिकांची फसवणूक करणारे कथित आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडकीस आले आहे. नांगरगाव परिसरातील ओमेगा सोसायटीमधील ‘देव व्हिला’ या बंगल्यावर लोणावळा शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 20 जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे 36 लाख 41 हजार 30 रुपये किमतीचे लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी हा बंगला भाड्याने घेऊन तेथे कॉल सेंटर सुरू केले होते. इंटरनेट, लॅपटॉप आणि मोबाईलच्या मदतीने अमेरिका, कॅनडा यांसह विविध देशांतील नागरिकांशी संपर्क साधला जात होता. आरोपी स्वतःला गुगल किंवा अमेझॉनसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करत असत.

काही नागरिकांना त्यांच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून घाबरवले जात होते. त्यानंतर प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली पैसे मागितले जात असल्याचा आरोप आहे. तसेच, विविध योजनांचे आमिष दाखवून नागरिकांच्या क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड आणि बँक खात्यांशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली जात होती.

या प्रकरणात इरफान अब्दुल गफूर शेख हा कथित मुख्य सूत्रधार असून, नाजिश आरिफ शेख ऊर्फ मो. फैज याच्या मदतीने तो हे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. फसवणुकीतून मिळालेली रक्कम क्रिप्टोकरन्सी आणि हवाला मार्गाने भारतात आणली जात होती का, याचाही तपास सुरू आहे.
अटक केलेल्या आरोपींपैकी बहुतांश जण 19 ते 26 वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचा संबंध मुंबईतील मालवणी-मालाड आणि बदलापूर परिसराशी असल्याची माहिती आहे.
या कॉल सेंटरचे परदेशातील संपर्क, आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीची एकूण व्याप्ती याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.






