मुंबई : विरारमधून मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.दोन नराधमांनी मित्राच्याच पत्नीवर सामूहिक अत्याचार केला असून पती घरी नसलेल्या संधीचा फायदा घेत आरोपींनी हे कृत्य केले. या प्रकरणी विरार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज यादव आणि विशाल अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी सूरज यादव हा पीडित महिलेच्या पतीचा जवळचा मित्र होता. गेल्या 5 वर्षांपासून त्यांची आपसात ओळख होती आणि सूरजचे त्या घरी सतत येणे-जाणे होते. त्यामुळे महिलेचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता.

घटना घडली त्या दिवशी, म्हणजेच 8 तारखेला महिलेचा पती घरी नव्हता. याच संधीचा गैरफायदा घेऊन सूरज यादव आपल्या विशाल नावाच्या मित्रासोबत त्या महिलेच्या घरी पोहोचला. घरात कोणी नसल्याचे पाहून दोन्ही नराधमांनी पीडितेच्या 4 वर्षांच्या लहान मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. निष्पाप मुलाच्या जीवाचे भय दाखवून दोघांनी महिलेवर बळजबरी करत सामूहिक अत्याचार केला. या अमानुष प्रकारामुळे महिला पूर्णपणे हादरून गेली होती.

घटनेनंतर पीडितेने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी तत्परता दाखवत सूरज यादव आणि विशाल विरोधात सामूहिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी देणे व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंदवल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विरार पोलीस करत आहेत. मैत्रीच्या विश्वासाला तडा देऊन घडवलेल्या या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण विरार परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.






