वाघोली, ता. 16 : वाघोली व लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानांचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला वाघोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तेजस विष्णू मेंढके (वय 32, रा. गायरान गोरे वस्ती, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांतील चोरीला गेलेले कपडे, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि पॉलीकॅब वायर असा एकूण 96 हजार 672 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत होती. 6 सप्टेंबर 2026 रोजी रात्रीच्या सुमारास वाघोली पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे व योगेश शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. वाघोली येथील गायरान गोरे वस्ती परिसरात राहणारा एक संशयित दुकानांचे पत्रे उचकटून घरफोड्या करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले.

पोलिसांनी संशयिताला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटविण्यात आली. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा घरफोडीच्या गुन्ह्यांतील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहेर, मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघु, सहायक फौजदार बाळासाहेब मोराळे, शिपाई महादेव कुंभार, विशाल गायकवाड, पांडुरंग माने, मारुती वाघमारे, अशोक शेळके, ऋषीकेश व्यवहारे, समिर भोरडे, योगेश शिंदे, आमेल घावटे, राहुल गोरे अमोल सरतापे, गहिणीनाथ बायने यांनी केली आहे.







