Kolhapur News : कोल्हापूर : संततधार पावसामुळे सध्या रस्ते निसरडे झाले असून, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच कोल्हापूरमधून एका रस्ते अपघाताची मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या चिमुकलीला शाळेत सोडण्यासाठी आई दुचाकीवरून निघाली. रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवरून अचानक आईचा तोल गेला आणि चिमुकली गाडीवरून खाली पडली. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच मागून आलेली बस चिमुकलीच्या अंगावरून गेली आणि आईच्या डोळ्यांदेखत तिला मृत्यूने कवटाळले.
सानेगुरुजी वसाहतीतील दुर्घटना
मन हेलवणारी ही घटना आज सकाळी सानेगुरुजी वसाहतीमध्ये घडली.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव संस्कृती रत्नदीप खरात (रा. फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी) असे आहे. संस्कृतीची आई स्नेहा खरात या सकाळी दुचाकीवरून संस्कृतीला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. बस स्टॉपवर थांबलेल्या केएमटीच्या बसला ओव्हरटेक करताना स्पीड ब्रेकरवर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि संस्कृती गाडीवरून खाली पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या केएमटी बसचे चाक संस्कृतीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. (Kolhapur News) परिसरातील नागरिकांनी तिला उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणण्यात आला होता. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संस्कृतीच्या अशा अकाली जाण्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आले आहे. (Kolhapur News) याच पाण्यातून वाट काढत वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात, परिणामी गाडी घसरुन अपघात होण्याची शक्यता वाढते, अशा परिस्थितीत धोकादायक रस्त्यांवर वाहन चालवणे टाळावेत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : कोल्हापूर हादरले! अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या