पुणे : वाघोली येथील अट्टल गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातुन तब्बल २ वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली आहे.
किशोर संजय गायकवाड (वय-१९, रा.वाचेश्वरनगर गोरेवस्ती रोड, गायरान वाघोली ता. हवेली जि.पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर गायकवाड हा लोणीकंद, वाघोली, भावडी गाव, लोहगाव, तसेच आसपासच्या भागात नजिकच्या भागात दहशत निर्माण करीत होता. तसेच स्थानिक नागरीकांना वारंवार त्रास देत होता. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, आरोपी किशोर गायकवाड याच्यावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ) (ब) प्रमाणे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांच्याकडे पाठविला होता. पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून आरोपीला पुणे जिल्ह्याच्या हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुर, सागर कडु, बाळासाहेब सकाटे, किरण पड्याळ, कुणाल सरडे, नवनाथ शिंदे आणि विजय आवाळे यांच्या पथकाने केली आहे.