Khed News : आळंदी, (पुणे) : मरकळ (ता. खेड) हद्दीतील सुदर्शन वस्ती येथे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले एक दिवसाचे अर्भक आढळून आले. गुरुवारी (ता. २०) दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. Khed News
याप्रकरणी पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरकळमधील सुदर्शन वस्ती येथे क्रिएटीव्ह इंटरप्रायजेस या कंपनीजवळून कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावर जास्त रहदारी नसते. क्रिएटीव्ह इंटरप्रायजेस या कंपनीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून एक बाळ सोडले असल्याले निदर्शनास आले. Khed News
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. पावसात प्लास्टिकच्या पिशवीत थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याला थंडीमुळे इन्फेक्शन झाले असल्याचे निदान झाल्याने त्याला औंध येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, आळंदी पोलिसांनी जिल्हा बालकल्याण समितीला घटनेची माहिती दिली आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने बाळाला संबंधित संस्थेत सोडले जाणार आहे.