जीवन सोनवणे
Khandala News : खंडाळा, (सातारा) : पाच दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावरील नाल्यात विचित्र स्वरूपात मृतदेह आढळून आला आहे.

पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृत्यू
ध्रुव स्वप्नील सोनावणे (वय १८, रा. बावधन, पुणे) असे त्याचे नाव असून, तो रविवार (ता. १७) घरातून निघून गेला होता.

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी बोगद्यानंतरच्या पहिल्याच वळणावर ध्रुव सोनावणे हा दुचाकीसह नाल्यांमध्ये पडला होता. मात्र, झाडी व गवतामुळे तो कोणाच्याही निर्देशनास आला नाही. रस्त्यालगतची झुडपे काढताना त्याची दुचाकी दिसून आल्याने शोध घेतला असता ध्रुव सोनावणे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

अपघात होऊन ध्रुव याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ध्रुव याचे आई-वडील व आजी हे अमळनेर (जळगाव) हे मूळ गावी गेले असता तो बावधन येथील घरी एकटाच होता. रविवारी सकाळी ध्रुव याच्या आत्याने चौकशी केली असता, तो घरी नसल्याचे कळाले. सीसीटीव्हीद्वारे तो घर सोडून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर ध्रुव बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलिसांमध्ये नोंदविली.
दरम्यान, ध्रुव याचे लोकेशन रविवारी दिवसभर पारगाव खंडाळा, भोळी (ता. खंडाळा) व वाई असे दिसत होते. मात्र, रविवारी सायंकाळपासून लोकेशन मिळत नव्हते. दरम्यान ध्रुव याचे वडील व नातेवाईक या परिसरात गेले पाच दिवस कसून शोध घेत होते. या घटनेची खंडाळा पोलिसात नोंद झाली असून, पुढील तपास पोळ करीत आहेत.







