संदीप टुले
Kedgaon News : केडगाव : आई आणि मुलीमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना दौंड (जि. पुणे) येथील रेल्वे डिफेन्स कॉलनीत बुधवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे दौंडसह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
दिक्षा हरिओम जागिंड (वय १८) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर सरिता हरिओम जागिंड असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलीचे वडील हरिओम श्यौप्रसाद जागिंड (वय ४४, व्यवसाय नोकरी, रा. डिफेन्स कॉलनी, रेल्वे कॉर्टर, दौंड, मूळ रा. गणपत विहार, तिजारा फाटक, अलवर, राजस्थान) यांनी फिर्याद दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम जागिंड हे दौंड रेल्वेमध्ये पॉइंट्स मॅन म्हणून नोकरी करतात. जागिंड हे पत्नी सरिता व मुली दिक्षा, विजयलक्ष्मी (वय १६), पायल (वय १४), अनु (वय ९) यांच्यासोबत रेल्वे डिफेन्स कॉलनीत राहतात. बुधवारी (ता. ६) मुलगी दिक्षा हिचा शाळेत वाद झाला होता. त्यामुळे दिक्षा घरी आल्यानंतर अबोला धरला होता. या रागातूनच दिक्षा सायंकाळी अचानक रागाने घराबाहेर निघाली. दिक्षा बाहेर जाताच आईने तिला दारातून आत ओढले आणि बेडवर बसविले. याचवेळी चिडलेल्या आईने दिक्षाच्या पोटावर जोरात लाथ मारली. प्रत्युत्तरानंतर दिक्षानेही आईला धक्का दिला.
दरम्यान, आई सरिताला राग अनावर झाला आणि तिने दिक्षाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या दोघींची भांडणे सोडविण्यासाठी लहान मुलगी विजयलक्ष्मी हिने मध्यस्ती केली असता तिलाही दोघींच्या भांडणात धक्का लागून ती खाली पडली. या भांडणात सरिताने दिक्षाच्या गळ्यावर लाथ मारून तिला बेडवर आडवे पाडले आणि दोन्ही हाताने गळा दाबला. त्यानंतर दिक्षा बेडवर निपचित पडली.
दरम्यान, ही संपूर्ण घटना मुलगी विजयलक्ष्मी हिने तिचे वडील हरिओम जागिंड हे कामावरून घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर हरिओम यांनी दिक्षाजवळ जावून तिला आवाज दिला असता, ती हालचाल न करता, निपचित पडल्याचे दिसले. तिचे अंग थंड पडले होते. यातच तिचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
या घटनेनंतर हरिओम जागिंड यांनी थेट दौंड पोलीस स्टेशन गाठले आणि पत्नी सरिता हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.